चोपडा : प्रतिनिधी
बांधकाम करताना वापराचा रस्ता सोडावा, या कारणावरून अडावद (ता. चोपडा) येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दगड, विटांचा वापर करण्यात आला. घटनेत ८ ते १० जण जखमी झाले; तर, तब्बल ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, बुधवारी रात्री दोन गटात वाद निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली. यात आठ ते दहा जण जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी एक गट पोलीस ठाण्यात पोहोचला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चोपडा शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन, जळगाव येथून महिला राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व स्पेशल कमांडो फोर्स मागविण्यात आले. पोलिसांच्या पथकाने रात्रीच दंगेखोरांवर नियंत्रण मिळवले. रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे अडावद पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. रात्री १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. परस्पर विरोधी तक्रारीवरून ९३ जणांवर गुन्हा दाखल आहे. यात ४१ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे.