जळगाव : प्रतिनिधी
महिनाभरापासून मुलीकडे गेलेल्या कमल गोपाल तेली (वय ७२, रा. ढाकेवाडी) या वृद्ध महिलेच्या घरातून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह तांबे, पितळी भांडे व पुजेचे साहित्य असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी दि. १९ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ढाकेवाडी परिसरात कमल तेली या वृद्ध महिला वास्तव्यास आहे. दि. २ जुलै रोजी त्या गावातच राहत असलेल्या आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. दरम्यान, महिनाभर त्या तिकडेच राहत असल्यामुळे त्यांचे घर बंदच होते. ही संधी साधत चोरट्यांनी घाचे कुलूप उघडून घरातून चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, चार तोळ्याची पोत, पाच तोळ्याच्या पाटल्या, एक ग्रॅमचे नाणे, दोन ग्रॅम सोन्याचे तुकडे, चांदीची चैन, चांदीचे वेल, चांदीचे देव, चांदीचे दोन भाराचे तुकडे तसेच पितळी तांबे, कळशी, घागर, तांब्याचे फिल्टर, घंटी व इतर साहित्य असा एकूण ७२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही चोरी लक्षात आल्यानंतर तेली यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र उगले करीत आहेत.
चोरट्याने घराचे कुलपू तोडून ऐवज लांबवून नेला. मात्र चोरी केल्यानंतर त्याने घराला असलेल्या कुलूपणासारखे दुसरे नवीन कुलूप लावून तो पसार झाला होता. काही दिवसानंतर वृद्ध महिला घरी आल्यानंतर त्यांनी चावीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलूप उघड नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.