जळगाव : प्रतिनिधी
गुजरातसह राज्यभरातील विविध शहरातून ऑटो रिक्षा व दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून सहा रिक्षांसह १४ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलावून त्यांची विक्री केली, तर काही वाहने गहाण ठेवल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून चोरी झालेली दुचाकी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तरुण वापरत असून होता. ती दुचाकी तो पंधरा हजारात विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे पथकातील कर्मचारी प्रवीण भालेराव यांना मिळाली. त्यांनी दुचाकी विक्री करणाऱ्या आमीन कालु मणियार (वय ३९, रा. रंगारी मोहल्ला पाळधी, ता. धरणगाव) याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदार मुस्ताकीन अजीज पटेल (वय २८, रा. पाळधी, ता. धरणगाव) व जाबीर सलमान शेख (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने पाळधी येथून मुस्तकीन व आमीन या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर हल्ली मालेगाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पथक रात्रीच मालेगावात दाखल झाले, त्यांनी तेथून जाबीर शेख याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी १४ दुचाकींसह ६ ऑटो रिक्षा काढून दिल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, एलसीबीचे पोनि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रीकृष्ण पटवर्धन, पोहकों संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, पोना प्रवीण भालेराव, सागर पाटील, संदीप पाटील, जयवंत चौधरी, प्रदीप चवरे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, दीपक चौधरी, भारत पाटील यांच्या पथकाने केली.