यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील चुंचाळे येथील निंबा देवी धरणात मित्रांसोबत गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची सोमवारी (दि. १९) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. मृत तरुणाचे नाव वेदांत सुवर्णसिंग पाटील (२०, रा. निमगाव, ता. यावल) असे आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील निमगाव येथे वेदांत पाटील हा आई-वडील आणि बहीण सोबत वास्तव्याला होता. सध्या तो पदवीचा शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता, रक्षाबंधनानिमित्त सुट्टी असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत निंबा देवी धरणावर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान, धरणाच्या सांडव्यामध्ये पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडला. त्यानंतर तो वर आलाच नाही. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शोध घेतला. त्याला बाहेर काढल्यानंतर तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने पाटील कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडील आक्रोश केला. या घटनेमुळे निमगाव सुन्न झाले होते. याबाबत यावल पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.