धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील जैन गल्लीतील बंद घर चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी पहाटे घडली. सोनाराच्या दुकानात चोरीसाठी सलूनचे दुकानही फोडले. परंतु, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्यामुळे चोरट्यांचा सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला.
मिळालेल्या माहितीनुसार, जैन गल्लीत विवेक लाड हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. काही कामानिमित्त दोन दिवसांपूर्वी ते मुंबई येथे गेले आहेत. घर बंद असल्याची संधी साधत पहाटे ४ वाजेच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामान अस्तव्यस्त करत दागिने आणि रोकड शोधण्याचा प्रयत्न केला. लाड हे बाहेरगावी असल्यामुळे घरातून नेमकी किती रक्कम व ऐवज चोरीस गेला, हे लाड हे धरणगावात परत आल्यावरच समजू शकणार आहे.
याच चोरट्यांनी जैन गल्लीतील विजय झुंजारराव यांचे सलूनचे दुकान फोडून सराफाचे दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास जैन गल्लीतील सुयश डहाळे यांनी चोरट्यांना बघितले. त्यांनी तात्काळ धरणगाव पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार हे सहकाऱ्यांसोबत जैन गल्लीत पोहोचले पोलिसांना बघताच चोरट्यांनी पळ काढला. उपनिरीक्षक पवार यांनी सुभाष मराठे आणि मोहसीन खान या आपल्या सहकाऱ्यांसोबत चोरट्यांचा गल्ली बोळातून सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. अंधाराचा फायदा घेत चोरटे सोनवद रोडच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले. एक चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी सराफ व्यावसायिक बांधवांची रविवारी बैठक घेतली.