जळगाव : प्रतिनिधी
जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या रिक्षासमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने रिक्षा उलटून यशवंत डोके (३५, रा. भुसावळ) हा तरुण ठार झाला, तर रिक्षातील पाचजण जखमी झाले. हा अपघात रविवार (१८ ऑगस्ट) सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाजवळील हॉटेलसमोर झाला. जखमींवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोरुन रिक्षा जात असताना अचानक समोर कुत्रा आला आणि चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील यशवंत डोके हे ठार झाले उषाबाई वारके (रा. भुसावळ), चालक महेश सातव, मंगलसिंग राजपूत, शबानाबाई पिंजारी व नरेंद्र मराठे है जखमी झाले. शबानाबाई पिंजारी व नरेंद्र मराठे हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नशिराबाद पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातात ठार झालेले यशवंत डोके यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला, याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.



