मुंबई : वृत्तसंस्था
देशात पाच राज्यातील निवडणूक आज दुपारी ३ वा.जाहीर होत असतांना सर्वच पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी केली असतांना आज महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. मुंबईत आज सकाळी साडेदहा वाजता षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे.
दरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे,नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करतील आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून रणनीती या मेळाव्यात ठरवली जाणार आहे.
महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे असणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरेंना महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्त्व ठाकरेंनी करावे असा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावरुन भाजपची साथ सोडली. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानं ठाकरे सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते पुन्हा मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत. आपला मानस त्यांनी गेल्याच आठवड्यात केलेल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेसच्या नेत्यांकडे व्यक्त केला. पण काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलेला नाही. याबद्दलचा निर्णय निकालानंतर घेतला जाईल, असं काँग्रेस नेतृत्त्वाकडून ठाकरेंना सांगण्यात आलं.