नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात आज स्वातंत्र्याचा 78 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असून देशभरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली.
देशाला 11 व्यांदा संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 60 वर्षांनंतर लागोपाठ तिसऱ्यांदा देशाची सेवा कऱण्याची संधी दिली. लोकांचे आशीर्वाद व्यर्थ जाणार नाहीत. प्रत्येकाची सेवा, प्रत्येक कुटुंबाची सेवा, प्रत्येक क्षेत्राची सेवा करत देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहचवण्याचा संदेश मिळाला आहे. या लाल किल्ल्यावरून मी देशवासियांना नमन करतो
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हम सबका साथ सबका विकास हा मंत्र आम्ही साकारत आहोत, आम्हाला मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवनमान कळले आहे. त्यांच्या आयुष्यात सरकारी हस्तक्षेप कमी करण्याची व्यवस्था केली जात आहे. छोट्या छोट्या गरजांकडेही आपण लक्ष देतो. गरीब मातेला रडून झोपावे लागू नये यासाठी वीज, पाणी, गॅस आणि उपचाराची सोय केली जात आहे. सबका साथ सबका विकास हा मंत्र आपण साकारत आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या माता-भगिनींवर होत असलेल्या अत्याचारामुळे जनतेत संताप आहे, ही देखील चिंतेची बाब आहे. आम्हाला ते जाणवत आहे. महिलांवरील गुन्ह्यांचा त्वरीत तपास करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. महिलांवरील अत्याचाराच्या घटना चर्चेत राहिल्या की, पाप करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांना फाशी झाली पाहिजे. ही भीती निर्माण करणे आवश्यक आहे.