मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनसे व अजित पवार गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अद्याप संपलेला नाही. त्यातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेले ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होती, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आरोप करताना अमोल मिटकरी यांनी सुपारीबाज असा उल्लेख केला होता. त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. त्यानंतर हा वाद चांगलाच वाढला. मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमोल मिटकरी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय समोर आंदोलन देखील केले होते. त्यानंतरही अमोल मिटकरी यांची भाषा अद्याप बदललेली नाही. असे असताना बाळ नांदगावकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे या भेटीची चर्चा आता सुरू झाली आहे.
महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या कार्याचे कौतुक केले होते. अजित पवार यांनी काहीही केले असले तरी त्यांनी कधीही जातीवाद केलेला नाही. अशा शब्दात राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. अजित पवार यांचे बाबतीत कितीही मतभेद असले तरी ते जातीच्या राजकारणात ते कधीही पडले नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. शरद पवार यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे कौतुक केले होते.