जळगाव : प्रतिनिधी
अभ्यास करीत नसल्याने वडिलांनी रागावले म्हणून अल्पवयीन मुलाने घर सोडले व थेट पुणे गाठले. मात्र आईच्या आठवणीने घरी येत असताना मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कार्यवाही पूर्ण करून कुटुंबाच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागामधील अल्पवयीन मुलगा ६ ऑगस्टच्या रात्री ११ वाजेपासून ते ७ ऑगस्टच्या पहाटे चार वाजेदरम्यान घरातून निघून गेला होता. त्याच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याप्रकरणी दि. ७ ऑगस्ट रोजी गुन्हाही दाखल झाला. पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. गणेश सायकर हे तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही शोध सुरू केला. या मुलाजवळ असलेल्या मोबाइलच्या लोकेशनवरून तो अहमदनगर येथे असल्याचे समजले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जळगावात आणले.
येथे त्याचा जबाब घेत प्रक्रिया पूर्ण करून त्याला सोमवारी (१२ ऑगस्ट) कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. मुलाचा जबाब घेतला त्यावेळी त्याने सांगितले की, अभ्यासावरून रागविल्याने आपण घरातून निघून पुणे येथे गेलो होतो. मात्र तेथे आईची आठवण येऊ लागल्याने पुन्हा घरी येत होतो.