जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर अंतर्गत असलेल्या खाँजानगर भागातील बर्फ कारखान्यात अमोनिया गॅसचा स्फोट मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास झाला. मदतीसाठी गेलेल्या पहूरपेठचे सरपंच अबू तडवी यांना श्वसन आणि उलट्या होण्याचा त्रास सुरू झाल्याने जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री येथील बर्फ कारखान्यात अमोनिया गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे गॅस काही वेळातच वातावरणात पसरला. रात्रीची वेळ असल्याने कारखान्यात कुणीच नव्हते. गॅस वातावरणात पसरताच ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. ही वार्ता गावात पसरताच लोक सैरावरा घर सोडून पळू लागले. दरम्यान, या ठिकाणी मदतीसाठी गेलेल्या सरपंच अबू तडवी यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले आहे. गावातील ४ ते ५ ग्रामस्थांना पहूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास हजार ते दोन हजार लोकवस्तीचा हा परिसर आहे. दरम्यान, पोलिसांना माहित कळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. वातावरणातील अमोनियाचे प्रमाण कमी होताच ग्रामस्थ पुन्हा गावात परतू लागले.