पुणे : वृत्तसंस्था
पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडली. त्यांचं मराठ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी पुन्हा सरकारला सुपडा साफ करण्याचा इशारा जरांगेंनी दिला. मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र जरांगे मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही, असं भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. छगन भुजबळांनी पुन्हा आपल्या ओबीसी एल्गार सभा सुरू केल्या असून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाहीच, असं सांगलीतील सभेतून छगन भुजभळ म्हणालेत. यालाच पलटवार म्हणून जरांगेंनी सुपडा साफ करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ, सरकराच नाहीतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील मनोज जरांगे पाटील यांनी बजावलं आहे.
महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही म्हणणाऱ्या मराठ्यांची ताकद काय यावेळी हे दिसेल, असं जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र भर सभा सुरू झाल्यात. तर भुजबळांनी देखील एल्गार पुकारत सभा घेणं सुरू केलंय. ज्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी सगेसोयरेंना विरोध दर्शवत ते टिकणारच नाही, असे म्हटलंय तर जरांगेंकडून धूळ फेक सुरू असल्याचेही म्हणत पडळकरांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.
दरम्यान अहमदनगरला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेचा भडिमार केला. भुजबळांनी ओबीसींचं वाटोळं करू नये. ओबीसी आणि मराठा समाज एकत्र आहे. भुजबळ त्यांच्या स्वार्थसाठी राजकारण करत आहेत. राजकारणासाठी गोरगरिबांमध्ये भांडण लावू नये, असं जरांगे म्हणाले.
आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा, असं म्हणत काही मराठा बांधव शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवास्थानी दाखल झाले होते. यावर देखील मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांचं हे अभियान त्यांना मराठा समाजात फूट पाडायची आहे. मात्र, मी आहे तोपर्यंत मराठ्यांमध्ये फूट पडणार नाही. त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असंही जरांगे म्हणाले. राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं नाही तर आम्ही विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करू. राखीव जागांवरूनही मराठा उमेदवार निवडून आणू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. पत्रकारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता, मी मुख्यमंत्री होणार नाही. कारण मी स्वार्थी आणि लुटून खाणारा नाही, असा टोला जरांगेंनी लगावला.