नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात सध्या गंभीर घटना घडत असतांना नुकतेच श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणीच्या चौथ्या सोमवारी बिहारच्या जेहानाबादमध्ये सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 कावड धारकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. तेथे बरेच लोक पडले होते.
ही घटना रविवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. लाठीचार्ज झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. बराबर टेकडीवर भाविक एका बाजूने उतरत होते आणि दुसऱ्या बाजूने चढत होते. गोंधळ झाल्यावर बंदोबस्तात सहभागी असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. यामुळे चेंगराचेंगरी झाली, भाविक जीव वाचवण्यासाठी धावू लागले आणि चिरडले गेले.
मृताचे नातेवाईक कृष्ण कुमार यांनी सांगितले की, ‘या घटनेत सुमारे 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. दर्शनासाठी आलेले भाविक असे सांगत आहेत. रात्री 2 वाजल्यापासून लोक रुग्णालयात आहेत. प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केलेली नाही. प्रशासनाकडेही वाहन असते तर लोकांचे प्राण वाचू शकले असते. निष्काळजीपणा झाला आहे. प्रत्येकी चार मृतदेह एका रुग्णवाहिकेतून पाठवले जात आहेत. काही मृतदेह बाहेर काढले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. जहानाबादच्या डीएम अलंकृता पांडे म्हणाल्या, ‘आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 7 जणांमध्ये गया जिल्ह्यातील मोर टेकरी येथील रहिवासी पूनम देवी, मखदुमपूर पोलिस स्टेशन हद्दीतील लदौआ गावातील निशा कुमारी, जल बिघा येथील नाडोल येथील सुशीला देवी, एरकी येथील निशा यांचा समावेश आहे. राजू कुमार आणि प्यारे पासवान या दोन पुरुषांचा समावेश आहे, तर एका महिलेची ओळख पटलेली नाही, पोलिस तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.