जळगाव : प्रतिनिधी
रात्री जेवण केल्यानंतर झोपेत उलटी घशात अडकल्यामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जिज्ञासा नरेंद्र निकुंभ (वय १६, रा. गणपतीनगर) असे मयत मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिज्ञासाचे वडील नरेंद्र निकुंभ हे शहरातील जीएसटी विभागात जीएसटी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिज्ञासा ही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता जिज्ञासाचे क्लास असायचे, त्यासाठी पहाटे ५ वाजता जिज्ञासाची आई तिला उठविण्यासाठी गेली असता, तिचे शरीर पूर्णपणे थंड पडलेले आढळून आले लागलीच जिज्ञासाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री झोपेत तिच्या घशात उलटी अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. जिज्ञासा अतिशय हुशार व मेहनती असल्याने, तिच्या अचानक मृत्यूमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या पश्चात आई, वडील व लहान बहीण असा परिवार आहे. जिज्ञासाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री १२ वाजेपर्यंत तिने अभ्यास केला होता. त्यानंतर ती झोपली, दरम्यान, तिला याआधी कोणताही आरोग्यासंबंधी त्रास नसल्याचीही माहिती नातेवाईकांनी दिली.