मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आघाडी व महायुतीमधील नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध सुरु झाले असून भाजपचे माजी खा.रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजप नेते माजी खासदार रावसाहेब दानवे म्हणाले कि, युतीच्या काळामध्ये जागा वाटपाचा निर्णय, निवडणुकीची रणनीती आतापर्यंत ‘मातोश्री’वर ठरवली जात होती. मात्र आता मातोश्रीच्या बाहेर निघून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारात जाऊन उभे राहण्याची पाळी या राज्यातील जनतेने तुमच्यावर आणली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
मातोश्रीवरच्या बैठका आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी होऊ लागल्या असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या या दिल्लीवारीवर टीका करण्यात येत आहे.