जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एकनाथनगर भागात वास्तव्याला असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीने बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्त्यालगत दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे ट्रॅकलगत ही घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता ही घटना समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका अरुण गोसावी (वय २४, रा. एकनाथनगर, मेहरूण परिसर जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती मेहरूणमध्ये परिवारासह राहत होती. प्रियंका जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण घेत होती. दरम्यान, बुधवारी सकाळी महाविद्यालयात जात असल्याचे कारण देत, घराबाहेर निघाली असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.