लातूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली असून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील जवळपास 250 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना सोलापूर आणि शिवडी येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली होती. उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्हा दौऱ्यात देखील त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी जाहीर केलेला हा तिसरा उमेदवार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नावाची घोषणाच थेट राज ठाकरे करत आहेत. त्यात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात संतोष नागरगोजे हे निवडणुकीला सामोरे जातील हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला एवढी मोठी संधी राज ठाकरे यांनी दिली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आतापर्यंत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आम्ही जे काम केले आहे, त्या कामावरून आम्हाला आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास असल्याचा दावा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संतोष नागरगोजे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. विलासराव देशमुख असो किंवा गोपीनाथ मुंडे असो या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या अधिपत्याखाली हा मतदारसंघ होता. मात्र हे दोन्ही नेते गेल्यानंतर या भागाचा विकास झालेला नाही. या भागात अनेक प्रश्न आहेत. गेल्या पंधरा वर्षात या भागात कोणत्याही विकासाचे काम झालेले नाही. मात्र आमच्याकडे कोणतीही सत्ता नसताना देखील या मतदार संघाच्या विकासासाठी महाराष्ट्र निर्माण सेना लढा देत आहे. केवळ कामाच्या मुद्द्यावर जर निवडणूक झाली तर महाराष्ट्र निर्माण सेनेचा विजय निश्चित असल्याचा दावा देखील नागरगोजे यांनी केला आहे.