जळगाव : प्रतिनिधी
पोलिस ठाण्याच्या आवारात साफसफाई करत असताना स्वच्छता करण्यासाठी औषधाची बाटली उघडताना तोंडात विषारी औषध गेल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय दिलीप गोयर (वय ३९, रा. पहूर, ता. जामनेर) असे मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विजय दिलीप गोयर हे आई, पत्नी, दोन मुलं यांच्यासह पहूर येथे वास्तव्याला होते. गेल्या १५ वर्षांपासून पहूर पोलिस ठाण्यात स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होते. रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारात स्वच्छतेसाठी लागणारी औषधाची बाटली उघडत असताना अचानकपणे त्यातील औषध तोंडात गेले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारातील कर्मचाऱ्यांनी तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी १०.३० वाजता मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.