रावेर : प्रतिनिधी
जिल्ह्यात आठवडाभरापासून दमदार पाऊस सुरु आहे. यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु. गावातील एका घराची भिंत कोसळली. दैव बलवत्तर असल्याने कुटुंबातील सर्व बचावले मात्र काही सदस्यांना दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी हे त्याठिकाणी पोहचले. कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांनी उघड्यावर पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी संसारोपयोगी साहित्य आणि काही आर्थिक मदत दिली.
यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु. गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात राहणाऱ्या बाळू भगवान सोनवणे यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी कुटुंबातील काही सदस्यांना किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह धीरज अनिल चौधरी यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सोमवारी सकाळीच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी संकटग्रस्त कुटुंबाची भेट घेतली.
पावसाळ्याच्या दिवसात संसार उघड्यावर आल्याने कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू होते. कुटुंबाला आधार देत अनिल चौधरी यांनी कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य आणि आर्थिक मदत देऊन त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेने घरांची आवश्यकता असल्यास डागडुजी करून घ्यावी, असे आवाहन अनिल चौधरी यांनी केले आहे.