नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशात आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये पुन्हा हिंसाचार झाले. रविवारी झालेल्या संघर्षात 91 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या चकमकीत डझनभर लोक जखमीही झाले. या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशात आपल्या नागरिकांना संपर्कात राहण्यास आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यासाठी भारताच्या सहाय्यक उच्चायुक्ताने +88-01313076402 आपत्कालीन क्रमांक जारी केला.
बांगलादेशातील आरक्षण प्रणालीत 1971 मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील निदर्शनांनी रविवारी पुन्हा जोर धरला.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचा मागणी लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशात पोलिस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 200 हून अधिक लोक मारले गेले होते.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सरकारच्या राजीनाम्याच्या मागणी आणि असहकार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आंदोलक जमा झाले होते. त्यावेळी आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांत चकमक सुरू झाली. यात तब्बल ९१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने सांयकाली सहापासून देशभरात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे.