धुळे : वृत्तसंस्था
तालुक्यातील लळींग आणि चौगाव गावात सर्पदंशामुळे दोन बालकांनी आपला प्राण गमावल्याची घटना घडली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यात एका बालकासह बालिकेचा समावेश असून या प्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लळींग गावात दुर्गा सोमा पवार (वय 7 रा. लळींग ता. धुळे) ही बालिका तिच्या मैत्रिणीच्या राहत्या घराच्या पाठीमागे खेळत असताना सर्पाने दुर्गाच्या उजव्या पायाला दंश केला असता उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती दुर्गा हिचा मृत्यू झाला. डॉ. अर्जुन यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. या प्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस सोनवणे करत आहेत.
धुळे तालुक्यातील चौगाव गोतणे येथे 9 वर्षीय बालक इमानविल जगदिश सोनवणे (वय 9 रा. चौगाव ता. धुळे) परिवारासह राहत्या घरात जमिनीवर झोपला असता अचानक सापाने त्याच्या उजव्या पायाला दंश केला. तो रडू लागला यावेळी साप चावल्याचे निदर्शनास आल्याने त्यास उपचारार्थ येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांमध्ये बालकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आले.