जळगाव : प्रतिनिधी
पती चेन्नई येथे गुरू महाराजांच्या दर्शनासाठी, तर पत्नी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या असताना चोरट्यांनी भरदिवसा खिडकीचे ग्रील कापून रोख एक लाख ५० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात आठ तोळे सोने आहे. ही चोरी रविवारी (४ ऑगस्ट) दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोड परिसरातील लोकमान्य हौसिंग सोसायटी परिसरात राहणारे कांतीलाल कटारिया हे गुरू महाराजांच्या दर्शनासाठी चेन्नई येथे गेले आहेत, तर त्यांच्या पत्नी शशिकला कांतीलाल कटारिया (६४) या सकाळी साडेसात वाजता धार्मिक कार्यक्रमासाठी गणपतीनगरात गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख एक लाख ५० हजार रुपयांसह ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलस, ३० ग्रॅम सोन्याच्या पाटल्या, १० ग्रॅमचे कर्णफुले, १० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, २०० ग्रॅमचा चांदीचा गणपती, ३०० ग्रॅम चांदीचे साखळ्यांचे जोड, ३५० ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के असा एकूण तीन लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
गणपतीनगरातून शशिकला कटारिया या घरी परतल्या त्यावेळी त्यांना बेडरूमधील दिवे सुरु दिसले. त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते, तसेच पाठीमागे असलेल्या खिडकीचे ग्रील तुटलेले होते. चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली असता दुसऱ्या बेडरूममधील व हॉलमधील कपाटदेखील उघडे दिसले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सपोनि मीरा देशमुख, सलीम तडवी, मिलिंद सोनवणे, अजय अहिरे, प्रशांत सैंदाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे संजय हिवरकर हे घटनास्थळी पोहोचले.