पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत. मोहम्मद एजाज नियाज मोहम्मद मोमीन (१२), मोहम्मद हसन नियाज मोहम्मद मोमीन (१६, दोघे रा. बडा मोहल्ला, पारोळा) आणि आवेश रजा मोहम्मद जैनुद्दीन (१४, रा. रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील एजाज आणि हसन हे दोघे सख्खे भाऊ तर आवेश हा त्याचा आतेभाऊ होता; तो दोन दिवसांपूर्वीच मालेगावहून पारोळा येथे आला होता.
सविस्तर वृत्त असे कि, बडा मोहल्ला भागातील मुले शनिवारी दुपारी भोकरबारी धरणाकडे गेले होते. तिथे वरील तीन जण हे पाण्यात उतरले. तीनही जणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने ते बुडाले. त्यांच्यासोबत असलेल्या अश्रफ पीर मोहम्मद (९) आणि इब्राहिम शेख अमीर (१४) यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता ते वाचवू शकले नाहीत. विशेष म्हणजे पाचपैकी कुणालाही पोहता येत नव्हते.
अश्रफ आणि इब्राहिम या दोघांनी लगेच वंजारी गावाकडे धाव घेतली. तेथील लोकांना घटना सांगितल्यानंतर येथील नागरिक घटनास्थळी पोहचले व मदत सुरू केली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पारोळा कुटीर रुग्णालयात डॉ प्रशांत रनाडे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. गिरीश जोशी, मंगला त्रिवेणी, दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी, प्रेम वानखडे यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान बडा मोहल्यातील तीन जणांचा भोकरबारी धरणात बुडून मृत्यू झाल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. मुलांचे नातेवाईक व मोहल्यातील नागरिकांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती.