मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गावा- खेड्यांसह शहरांतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा केले जाणार आहेत. त्यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे. अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी एक रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत खूप अर्ज येत आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणे, हे आमच्यासाठी निश्चितपणाने गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणी प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे. ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होण्यासाठी निश्चितपणाने मदत होणार आहे. अर्जदार माता-भगिनींना आमची विनंती आहे की, हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतचा कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्या प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला आणि बालविकास विभागाकडे 1 कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार आहोत. हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन करते.