जळगाव : प्रतिनिधी
पुण्यात दरोडा टाकून पसार झालेल्या जितेंद्र उर्फ जितू प्रदिप वाघ वय ३२, रा. वाघनगर, भूषण गोकुळ कोळी वय २७, रा. समता नगर व चंद्रशेखर उर्फ चंदू रमेश देशमुख वय २३, रा. महाबळ या तिघ संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कानळदा येथून मुसक्या आवळल्या.
सविस्तर वृत्त असे कि, पुणे येथील चतृः श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून पसार झालेले संशयित हे कानळदा गावाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी पोकॉ रविंद्र कापडणे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पथक तयार करुन रवाना केले. या पथकाने सापळा रचून कानळदा ते भोकर रस्त्यावर गावाच्या बाहेर एका टपरीजवळ बसलेल्या जितेंद्र उर्फ जितू वाघ, भूषण कोळी व चंद्रशेखर उर्फ चंदू देशमुख या तिघ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी पुणे येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ महेश महाजन, हेमंत पाटील, रविंद्र कापडणे, राहुल कोळी यांच्या पथकाने केली.