मुक्ताईनगर : प्रतिनिधी
वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वडिलांना भेटू न दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. सोम रहिम पवार (१४) असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चार ओळींची सुसाइड नोटही लिहून ठेवली आहे. त्यात वरील उल्लेख केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगावनजीक वाघाची कातडी जप्त करण्यात आल्याची घटना २७ जुलै रोजी घडली होती. यात सहा जणांना वनविभागाने अटक केली होती. यात सोम याचे वडील रहिम रफीक पवार (४०) आणि आई तेवाबाई पवार (३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांचाही समावेश होता.
या गुन्ह्याच्या तपासकामी वनविभागाचे पथक संशयित रहीम याला घेऊन शुक्रवारी सकाळी हलखेडा येथे आले होते. त्यावेळी आपणास वडिलांना भेटू द्यावे, अशी मागणी सोम याने केली मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला भेटू दिले नाही. यानंतर काही वेळाने सोम याने घराशेजारीच असलेल्या पोल्ट्री फार्मसाठी उभ्या केलेल्या शेडमध्ये गळफास घेतला. हा प्रकार त्याच्या लहान बहिणीच्या लक्षात आला. यावर नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. सोम याच्या मृत्यूस वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमची आत्या नरेशना गांजी भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.