पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात विरोधकांनी चांगलेच रान पेटविले होते मात्र आता मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. आज न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकीलाने गेल्या सुनावणीवेळी उपस्थित नसल्याची कारणं यावेळी सांगितले आहेत.
गेल्या सुनावणीला आजारी असल्यामुळे जरांगे उपस्थित राहू शकले नाहीत. ते आजारी असल्याची त्यांची मेडिकल सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे त्यांचं वारंट रद्द करावं. आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांची आज तब्येत ठीक नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णवाहिकेमध्ये जरांगे आले आहेत, अशी माहिती जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे.
संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचे सांगितले आहे. तसे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे. या कारणास्तव न्यायालयाचा आदेश रद्द करण्याबाबत विनंती करण्यात आली. न्यायालयाचा आदेश असतानाही जरांगे पाटील न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने खटला प्रलंबित राहिला. हे प्रकरण 10 वर्ष जुने असून अशा जुन्या प्रकरणाचा त्वरित निपटारा होण्यासाठी योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे. वरिष्ठ कोर्टाचे त्यासंबंधीचे आदेश आहेत. जरांगे पाटील यांनी समजमाध्यमाद्वारे कोर्टाच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब समोर आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी करण्यापासून प्रत्येकाने टाळावे. त्यामुळे अवास्तव कारवाईस म्हणजे न्यायालयाच्या अवमान कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही, असंही यावेळी न्यायालयाने म्हटलं आहे.
सद्यस्थितीत आरोपीने या न्यायालयाबाबत अथवा न्यायालयाच्या पिठासीन अधिकाऱ्यांबाबत वक्तव्य केली असल्याने कारवाई करण्याचा अधिकार या न्यायलायचा आहे. जरांगे पाटील यांनी यापुढे टिप्पणी करताना दक्षता बाळगावी अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.
काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटलांविरोधात वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह आणखी दोन जणांची नावे घेण्यात आलेली आहेत. या प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर कोर्टाने मनोज जरांगे यांना दोन वेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.
त्यावेळी मनोज जरांगे आंदोलनामुळे पुण्यात कोर्टात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे दोन वेळा हजर राहण्यासाठी समन्स बजावून देखील हजर न झाल्याने कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोन जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पार पडणाऱ्या सुनावणीस मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मनोज जरांगे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहेत. ते आज सुनावणीला हजर राहणार आहेत.