मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीत असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी व राज ठाकरे यांच्या मनसेत गेल्या दोन दिवसापासून मोठे राजकारण सुरु असतांना दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसून आणखी हा वाद वाढत आहे. नुकतेच आ.अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहे.
आ.मिटकरी म्हणाले कि, जय मालोकर हा अजित पवार गटात प्रवेश करणार होता. त्यामुळेच त्यांच्यावर दबाव होता असा त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी राज ठाकरेंसह सर्वांची चौकशी झाली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. तसेच अजून मी विधिमंडळाचा दोन वर्षी सदस्य आहे. एक एक प्रकरण काढू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. जय मालोकरचा मृत्यू दबावातून झाला असल्याचा दावा मिटकरी यांनी केला. यावर ते म्हणाले की, ”जयच्या मृत्यूला मनसेचे पदाधिकारी जबाबदार आहेत. तो मुलगा तिथून कसा गेला, त्याच्या छातीला मार लागलेला का? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईलच. या सगळ्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे. मग त्यामध्ये राज ठाकरेंचीही चौकशी झाली पाहिजे”, असे मिटकरी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, माझ्या माहितीनुसार जय मालोकर 10 दिवसानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. त्याचीच खुन्नस मनसेला होते. कारण ते खुनशी लोक आहेत. रमेश किणीच्या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बाजूला केले. त्यांना वाटलं आपण मोकाट झालो. कोणाचाही जीव घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स वाढला. स्वत:च्या बापाच खून करण्याचीही त्यांची तयारी आहे”, अशा शब्दात मनसेवर मिटकरींनी तोंडसुख घेतले आहे.
तसेच मनसेवर त्यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, ”मनसे पक्ष पळपुट्यांचा, सोंगाड्यांचा आहे. नागपुरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या विकृत कृत्याच प्रकरण समोर आले आहे, लवकरच तुम्हाला ते समजेल. शेवटी मनसे हा सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही आणि बेवडेशाही असलेल्यांचा पक्ष आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे”, असे मिटकरी म्हणाले.