चाळीसगाव : प्रतिनिधी
शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार व कर्मचारी हे गस्तीवर असताना त्यांनी इलेक्ट्रिक मोटारपंप चोरी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ३० रोजी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, शेतमालाच्या होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालावा, असे आदेश पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे गस्तीच्या वेळी संशयित वाहनावर लक्ष ठेवून त्यांची तपासणी चाळीसगाव पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनांप्रमाणे ३० रोजी पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, हे.कॉ. रवी पाटील, दीपक पाटील, प्रवीण जाधव, अमोल भोसले, गणेश कुवर, गोपाल पाटील हे घाटरोड परिसरात गस्त घालत असताना ३ इसम दुचाकीवर विद्युतपंप घेऊन जाताना दिसले. या तिघा इसमांवर संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन हा मोटारपंप कोठून आणला, त्याबाबत विचारपूस केली.
ते उत्तरे देत नसल्याने मोटारपंप व ताब्यातील दुचाकी असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेतला. या इसमांनी पंपाच्या मालकीबाबत कोणतेही कागदपत्र न हजर केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १२४ व भारतीय न्याय संहिता कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे