जळगाव : प्रतिनिधी
पती कामावर तर मुले शाळेत गेलेली असताना राणी श्यामकांत देशमुख (४४, रा. ओम साईनगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (३० जुलै) संध्याकाळी मुले शाळेतून घरी आली त्यावेळी समोर आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कानळदा रोडवरील ओम साईनगरात राणी देशमुख या पती व दोन मुलांसह राहत होत्या. पती श्यामकांत देशमुख हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी (३० जुलै) दोन्ही मुले शाळेत तर पती कामावर गेले होते.
त्यावेळी घरात कुणीही नसताना विवाहितेने घरात गळफास घेतला. संध्याकाळी दोन्ही मुले घरी आली त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी घराच्या वरच राहणाऱ्या मावशीला दरवाजा बंद असल्याचे सांगितले. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह पोहेकों अनिल फेगडे, पोकों अनिल मोरे, रामकृष्ण इंगळे हे घटनास्थळी पोहोचले व विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.