जळगाव : प्रतिनिधी
निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन 2022 पासुन धरणाचे प्रस्तंभांचे बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे व आतापर्यंत सरासरी 11 मी उंची पर्यंतचे बांधकाम पुर्ण झालेले आहे.
जानेवारी 2024 मध्ये एकूण प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालानुसार रु. 4890 कोटी राज्य शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. या मान्यतेनुसार सद्यस्थितीत टप्पा 1 अंतर्गत मुख्य धरणाचे काम पूर्ण करायचे असून 10.4 TMC एवढ्या पाणी वापरासाठी भूसंपादन व पुनर्वसन करावयाचे आहे. जानेवारी 2024 मध्ये मंजूर प्रशासकीय मान्यतेनुसार, पहिल्यांदाच प्रकल्पाच्या संपूर्ण 25657 हेक्टर लाभक्षेत्रावर उपसा सिंचन योजना शासनामार्फत करावयास मान्यता प्राप्त झाली आहे.
केंद्र शासनाकडुन धरणास निधी उपलब्ध होण्यासाठी प्रकल्पाच्या अद्यावत किमतीस केंद्रीय जल आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता आवश्यक होती, त्याअनुषंगाने मार्च 2024 मध्ये प्रकल्पाच्या टप्पा 1 करीता राज्य शासनाने वित्तीय सहमती दिली असून, रु. 2888 कोटी एवढ्या टप्पा 1 च्या किंमतीस केंद्रीय जल आयोगाची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच एप्रिल 2024 मध्ये प्रकल्पाच्या टप्पा 1 करीता जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडुन रु. 2888 कोटीस गुंतवणुक मान्यता (Investment Clearance) प्राप्त झाली आहे. प्रकल्पास आवश्यक वन जमिनीसाठी केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मान्यता (Forest Clearance) देखील दि. 29 जुलै 2024 रोजी प्राप्त झाली आहे. प्रकल्पास आवश्यक सर्व वैधानिक मान्यता प्राप्त झालेल्या आहेत.
आता, निम्न तापी प्रकल्प (टप्पा 1) ला केंद्र शासनाकडुन निधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यासाठी, राज्य शासनाकडुन रु. 2888 कोटी एवढ्या किंमतीचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. या मान्यतेची पुढील कार्यवाही जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली येथे प्रगतीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली