मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना महायुती देखील आता बैठका घेण्यासाठी सज्ज झाले असून आता जागावाटपा आधीच तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
सध्या अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. ऋतुजा लटके या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. अंधेरी पूर्वच्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने निरीक्षक देखील नेमलाय. त्यातच समाजसेविका स्वीकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश केलाय. त्या अंधेरी पूर्वमधून विधानसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वीकृती शर्मा या वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
कारण, अंधेरी पूर्वची ही जागा महायुतीत आपल्याला मिळाली, असं भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. या जागेवर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आज बुधवारी संध्याकाळी भाजपचे अंधेरी पूर्व विधानसभेतील सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख अशी सर्वांची तातडीची बैठक देखील घेणार आहेत. या बैठकीला आमदार अमित साटम हे मार्गदर्शन करणार आहेत. याच बैठकीत अंधेरी विधानसभा निवडणूक भाजप लढवणार असा दावा देखील केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या जागेवरून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.