जळगाव : प्रतिनिधी
आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात आहे, बेकायदेशीर अॅडव्हटायझिंग अँड हॅरेसिंग पोर्नोग्राफीविषयी तक्रारी दाखल आहे तसेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठवून भुसावळ शहरातील गडकरी नगरात राहणारे ५३ वर्षीय व्यक्तीची सुमारे २२ लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ जुलै ते २६ जुलै दरम्यान घडला. या प्रकरणी सोमवारी २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गडकरी नगरात ५३ वर्षीय व्यक्ती हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला अहे. त्यांना १५ जुलै रोजी एक कॉल आला व आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात आहे, बेकायदेशीर अॅडव्हटायझिंग अँड हॅरेसिंग पोर्नोग्राफीविषयी तक्रारी दाखल असल्याचे सांगण्यात आले. या सोबतच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठविले. यातून तुम्हाला मदत करतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना माहिती विचारत गेले व त्यानुसार सदर व्यक्ती माहिती देत गेले. यात समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे पैसे पाठवत गेले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोमवारी २९ जुलै रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रात्री ८ वाजता अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत