यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील मोहराळा येथील २३ वर्षीय विवाहिता गावातीलच तिच्या २२ वर्षीय प्रियकर सोबत आपल्या एक वर्षीय बाळाला घेऊन पळून गेली होती. याच नैराश्यातून विवाहितेच्या पतीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोघांविरुद्ध तरूणास आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती. या दोघांची पोलिस कोठडी सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयाने आता १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील मोहराळा येथील तुषार गोपाळ पाटील (वय २८) या तरुणाची पत्नी वैष्णवी पाटील ही तिच्यासोबत एक वर्षीय बालक समर्थ याला सोबत घेऊन तिचा प्रियकर प्रशांत सहदेव पाटील (रा. मोहराळा) याच्यासोबत १६ जुलै रोजी पळून गेली होती. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तर तिचे पती तुषार पाटील यांना त्यांची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे, असे कळले तेव्हा ते निराश झाले. याच नैराश्यातून त्यांनी १९ जुलै रोजी मोहराळा येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी २७ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात तरुणाचे वडील गोपाळ शामराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैष्णवी पाटील आणि प्रशांत पाटील या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या दोघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. ही पोलिस कोठडी सोमवारी संपल्यावर दोघांना यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधिश आर. एस. जगताप यांच्या समोर हजर केले असता दोघांना १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. या दोघांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार राजेंद्र पवार, हवालदार उमेश सानप करत आहेत.