मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले असून मनोज जरांगे पाटील देखील निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहे. मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार ते निवडून आणणार आणि ते मंत्री देखील होणार. मात्र, आकडा 29 ऑगस्टला सांगू असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
गरजवंत मराठा विरुद्ध प्रस्थापित मराठा अशी लढाई पाहायला मिळेल का? या प्रश्नावर देखील त्यांनी उत्तर दिले. राजकीय पक्षांकडे देखील अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला नाही तर ते देखील आमच्याकडे येतील. ते आमची वाट पाहत आहेत आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. त्यांना एकालाच उमेदवारी द्यायची आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नाराज मराठे मराठा सामजाच्या जनसागरामध्ये सामील होतील, असा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
सगेसोयरे किंवा आरक्षणासंदर्भात मला सरकारच्या वतीने कोणाचाही फोन आलेला नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. मराठा, धनगर, मुस्लिमांना आरक्षण द्यायचे का नाही द्यायचे, हे आता राज्य सरकारला ठरवायचे आहे. या वेळी सरकारला सहानुभूती भेटणार नाही. सरकारचे डाव या वेळी अजिबात चालणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मागील 70 वर्षापासून लोक योजना पाहत आहेत, 70 वर्षापासून आश्वासन मिळत आहेत, 75 वर्षापासून लोक सरकार बघत आहेत. प्रत्येक पक्षाची जनतेविषयीची भावना आणि नियत जनता पाहत आहे. त्यामुळे कोणीही कितीही नादी लागू द्या, सरकार असो किंवा विरोधी पक्षाचे नेते असो, जो मराठ्यांच्या विरोधात बोलणार त्याचा पराभव निश्चित होणार, असा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.