मुंबई : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच दिल्लीत जाऊन मोदींची सपत्नीक भेट घेतली. त्यामुळे भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे सोपवली जाणार का, अशी चर्चा सुरु झाली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेले नाही. मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. भाजपच्या जागा 23 वरुन 9 वर आल्या. याची जबाबदारी घेत फडणवीसांनी राजीनामा देऊ केला होता. पण तो पक्ष नेतृत्त्वाने स्वीकारलेला नाही. त्यांच्याच नेतृत्त्वात भाजप विधानसभेची निवडणूक लढणार आहे. राज्यातले सरकार चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तीन पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे काम फडणवीस करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांशी देवेंद्र फडणवीसांचे चांगले संबंध आहेत. नागपूरचे असलेले फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलोख्याचे संबंध राखून आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नड्डा यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून लवकरच मोकळे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
भाजपचे नेतृत्त्व फडणवीसांना पक्षात महत्त्वाचे स्थान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या दिल्ली दौऱ्यातून आणि मोदींच्या भेटीतून दिसून आले. याआधी अध्यक्षपदासाठी काही नावांची चर्चा झाली. पण काही नावांना भाजप नेतृत्त्वाचा आक्षेप होता. तर काही नावे संघाला मान्य नव्हती. त्यामुळेच अध्यक्ष निवडण्यास उशीर झाला. फडणवीसांच्या नावाला पक्ष आणि संघाची मान्यता आहे. त्यामुळेच मोदी आणि फडणवीस यांची भेट महत्त्वाची ठरते.
महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री असलेले फडणवीस नागपूरमधून निवडून येतात. नागपूरचेच नितीन गडकरी याआधी भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत. फडणवीसांकडे अध्यक्षपद गेल्यास पक्षाला बरेच फायदे होऊ शकतात. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मनोज जरांगे पाटील सातत्याने फडणवीसांना लक्ष्य करत आहेत. त्याचाच फटका भाजपसह महायुतीला लोकसभेला बसला. आता फडणवीस दिल्लीत गेल्यास, पक्षाध्यक्ष झाल्यास मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला अधिक उत्तम प्रकारे हाताळता येईल. पक्ष नव्या नेतृत्त्वासह विधानसभेला सामोरा जाईल.