जळगाव : प्रतिनिधी
अवैधपणे दुचाकीवरून गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस आणि लोखंडी कोयता सोबत घेऊन दुचाकीने जात असलेल्या दोन जणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, लोखंडी कोयता आणि दुचाकी असा एकुण २ लाख ६ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली. मोहम्मद लतीफ शेख सलीम वय-२४ आणि इमरान खान अयुब खान वय-२३ दोन्ही रा. छत्रपती संभाजी नगर असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील छात्रसेन लासुर मार्गे उमर्टी येथे दुचाकीने २ जण गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करत संशयित आरोपी मोहम्मद लतीफ शेख सलीम आणि इम्रान खान अयुब खान यांचा रस्ता आडविला. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळून गावठी बनावटीचे ५ पिस्तूल आणि १० जिवंत काडतूस, धारदार लोखंडी कोयता आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण २ लाख ६ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस नाईक शशिकांत पाटील, राहुल रणधीर, रावसाहेब पाटील, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक सोनवणे, आत्माराम अहिरे यांनी कारवाई केली आहे.