जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत पंडित साबळे उर्फ चोर बाप्या आणि दोन महिन्यांपूर्वीच एमपीडीएमधून सुटून आलेला रितेश कृष्णा शिंदे उर्फ चिच्या या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घरफोडीचा तपास करीत असताना जालना येथून चोरलेली दुचाकी देखील पोलिसांच्या हाती लागली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चार महिन्यांपूर्वी निधन झालेल्या प्रेमलता लाड यांची मुलगी सासरी गेली आणि दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी बंद घरातून रोख १५ हजार रुपये व चांदीच्या वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत साबळे व रितेश शिंदे या दोघांनी केल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोउनि दीपक जगदाळे, सहायक फौजदार विजय पाटील, पोहेकों गणेश शिरसाळे, पोलिस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील, चंद्रकांत पाटील यांनी दोघांना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे. या घरफोडीचा तपास करीत असताना दोघांकडे जालना येथून चोरलेली दुचाकीही आढळून आली. पोलिसांनी तीदेखील हस्तगत केली.