एरंडोल : प्रतिनिधी
जवखेड्याकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कारने दुचाकीला समोरून कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर कोसळली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या सुनीताबाई अरूण देशमुख (४८, रा. माळीवाडा, एरंडोल) या जागीच ठार झाल्या. ही घटना रविवारी दुपारी १२:३० च्या सुमारास एरंडोल-जवखेडा रस्त्यावर पाटाजवळ घडली.
सविस्तर वृत्त असे कि, दुचाकीस्वार दुर्गेश अरूण देशमुख हा या अपघातात जखमी झाला. दुर्गेश हा दुचाकी क्रमांक (एमएच १९, डीसी ८४१५) ने त्याची आई सुनीताबाई देशमुख यांना घेऊन शेतीकामासाठी जात होता. दुर्गेश दुचाकी चालवत होता व त्याची आई दुचाकीवर मागे बसली होती. जवखेड्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून कट मारला. त्यात सुनीताबाई यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. याबाबत सचिन देशमुख यांनी फिर्याद दिल्याने कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.