जळगाव : प्रतिनिधी
नशिराबाद टोलनाका येथे सीमाशुल्क अधिकारी, पुणे व जळगाव यांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत वाघाची कातडी जप्त करण्यात आली. जळगाव वनविभागाने सहा आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, या आरोपींमध्ये अजवर सुजात भोसले (वय ३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, ह. मु. चांगदेव), मोहमंद अतहर खान (५८ रा., भोपाळ), नदीम गयासुद्दीन शेख (२६, रा. अहमदनगर), कंगनाबाई अजवर भोसले (३०, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर), तेवाबाई रहीम पवार (३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर), रहीम रफिक पवार (४०, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेले पाच मोबाइल, दोन दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वनगुन्ह्यात पकडलेली कातडी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या सूची-१ मध्ये येते. हा वनगुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. दरम्यान, वाघाची शिकार कुठे झाली, कातडी कोणाला विकली जाणार होती, याचा तपास सुरू आहे. तपासण्यांसाठी कातडीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारे मध्य प्रदेशात शिकार केल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी अवैधरित्या वन्यप्राणी ताब्यात ठेवू नये. त्यांची खरेदी, विक्री करू नये. असे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावा, असे आवाहन जळगाव वनविभागाने केले आहे.