जळगाव : प्रतिनिधी
देशी दारुच्या दुकानाची खिडकी तोडून चोरट्यांनी देशी दारुच्या तब्बल ७६८ बाटल्यांसह इतर साहित्य मिळून ६३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. ही चोरी २३ जुलै ते २४ जुलै दरम्यान तालुक्यातील नांद्रा येथे झाली. या प्रकरणी २५ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नांद्रा येथे मनीष लालचंद झवर (५३, रा. नवीपेठ, जळगाव) यांचे देशी दारूचे दुकान आहे. २३ जुलै रोजी रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारू दुकानाची लोखंडी ग्रीलची खिडकी तोडून दुकानात प्रवेश केला. तेथून चोरट्यांनी ५३ हजार ७६० रुपये किमतीच्या देशी दारुच्या १८० मि.ली.च्या ७६८ बाटल्या, १० हजार रुपये किमतीचे इन्वर्टर व बॅटरी असा एकूण ६३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी (२४ जुलै) ही चोरी समोर आली. या प्रकरणी मनीष झवर यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.