जळगाव : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील निंबादेवी धरण शुक्रवारी ओव्हरफ्लो झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागासाठी शेतकऱ्यांना एक वरदान ठरले आहे. २००५ साली हे धरण पूर्णत्वास आले आहे. धरणामुळे येथील निसर्ग सौदर्य खुलले आहे. येथील पर्यटकांचे आकर्षण लक्षात घेता निंबा देवी धरण हे पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी या परिसरातून होत आहे. यामुळे या परिसरातील लहान उद्योगांना चालना मिळू शकते.
यावल तालुक्याच्या पश्चिम भाग हा आधी ड्रायझोन व डार्क झोन म्हणून घोषित होता. परंतु, आता आता या धरणामुळे चुंचाळे, सावखेडा सिम, नायगाव, दहिगाव, बोराळे, नावरे, गिरडगाव, वाघोदा, शिरसाड, साकळी, वढोदे या गावांमधील शेत शिवारात विहिरींना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग दुबार उत्पन्न घेण्यासाठी सक्षम झाला आहे. साकळी, चुंचाळे, बोराळे या गावांतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा याच भागातून केलेली आहे.
गेल्या वर्षी या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती, म्हणून महाराष्ट्र शासन लघु पाट बंधारे विभाग जळगावकडून सुरक्षिततेसाठी निंबादेवी धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे, तर अनुचित घटना टाळण्यासाठी विशिष्ट प्रतिबंधासह या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवून पर्यटकांसाठी हा धरण परिसर खुला करावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे. असे न झाल्यास परिसरातील नागरिक व तालुक्यातील काही संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत? असा इशारा शुक्रवारी येथे जमलेल्या पर्यटकांनी दिला आहे. २६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास धरण पूर्ण भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातून तरुणांनी चांगलीच गर्दी करण्याची सुरुवात केली होती.