जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथील किराणा दुकानातून साखरेची तीन पोती चोरीस गेली होती. यात दुकानात हमाली काम करणाऱ्यासह दोन जणांना अटक झाली आहे. पहूर गावात इतर ठिकाणी केलेल्या चोरीची कबुली चोरट्यांनी दिल्याने चोरी करणारे रॅकेट समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख ऐनद्दीन शेख जैनुद्दीन (२६) आणि शेख अमजद शेख अब्दुल (३६, दोघे रा. खाँजानगर, पहूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर प्रवीण सुवालाल लोढा यांचे होलसेल किराणा दुकान आहे. शनिवार २० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाच्या गोडावूनमधून साखरेचे तीन पोती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यापूर्वीही अशाच घटना घडल्या होत्या. याबाबत अनोळखी व्यक्तींविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी ऐनद्दीन याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी केली असता. घटनेची संपूर्ण कबुली त्याने दिली. त्यामुळे पोलिसांनी तपास केला असता त्यात शेख अमजद हाही सहभागी असल्याचे निषन्न झाले. पहूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक भारत दाते, गणेश सुस्ते, पोकॉ. ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाळ माळी, विनोद पाटील, अमोल पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.