मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, पुणे सातारा जिल्ह्याला आज दि.२५ जुलै अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला उद्याही २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरला उद्या २६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
२५ जुलैला ‘इथे’ रेड अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा
२६ जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?
रायगड, रत्नागिरी, सातारा
मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
२५ जुलै- रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर
२६ जुलै- पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर
आज सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडला जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत पुढील ४ दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळमध्येही आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. अधूनमधून ६०-७० किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.