पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार आणखी वाढत असतांना पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील सुप्रसिद्ध लवासा प्रकल्पात दरड कोसळून 2 व्हिला जमिनीखाली गाडले गेलेत. त्यात 3 ते 4 जण बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बेपत्ता नागरिकांचा स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला जात आहे.
पुणे शहर व जिल्ह्याला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या य़आहेत. मुळशी तालुक्यातील लवासा येथे गुरुवारी 453.5 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे डोंगररांगातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. या पावसामुळे लवासा हिल स्टेशन परिसरात डोंगरावरील दरड कोसळून त्यातील 2 व्हिला अर्थात बंगले गाडले गेलेत. या बंगल्यात 3 ते 4 जण राहत होते. या घटनेत ते ही गाडले गेल्याची शक्यता आहे. त्यांचा स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. पण बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. यावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुळशी तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे बचाव पथक अडकून पडल्याची माहिती आहे. लवासा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनास येतात. ते विविध बंगल्यांत भाड्याने राहतात. पण पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे येथे दरड कोसळण्याची भिती असते. विशेषतः एखादी दुर्घटना घडल्याच्या स्थितीत या भागात वेळेवर मदतकार्य पोहोचण्यासही अडचण निर्माण होते. यामुळे प्रशासनाने नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, ताम्हिणी घाट परिसरातील आदरवाडी येथे दरड कोसळून 1 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे.
आत्तापर्यंत पुणे अग्निशमन दलाने पावसात अडकलेल्या जवळपास 160 नागरिकांची सुखरुप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. यासाठी त्यांनी बोटी, रस्सी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे विविध साहित्य वापरले. स्वत: मुख्यअग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे तसेच 20 अग्निशमन अधिकारी व राञीपासून जवळपास दोनशे फायरमन कार्यरत आहेत.