जळगाव : प्रतिनिधी
कासमवाडी परिसरात दोन झाडे मालवाहू रिक्षावर पडल्याने तिचा चक्काचूर झाला. तसेच घराची भिंत पडण्यासह वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. ही घटना बुधवारी (२४ जुलै) दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे कि, नेरी नाका, कासमवाडी परिसरातील भाजीपाला विक्रेते निशिकांत माळी यांनी त्यांच्या मालकीची मालवाहू रिक्षा (एमएच १९, बीएस १७७८) बुधवारी घरासमोर उभी केली होती. दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर घरासमोर असलेली दोन झाडे या रिक्षावर तसेच त्यांच्या शेजारील घराच्या भिंतीवर पडली. यात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, भिंतही पडली. झाडे पडल्याने वीजवाहक ताराही तुटल्या. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेत माळी यांचे नुकसान झाले असून, रोजगाराचे साधनच हिरावले गेले आहे. दरम्यान, दुपारनंतरही रात्री उशिरापर्यंत कधी जोराचा तर कधी रिपरिप पाऊस सुरूच होता.