धुळे : प्रतिनिधी
शहरातील फागणे गावाजवळ १८ जुलै रोजी सायंकाळी धरणगाव येथील व्यावसायिक आणि त्यांच्या मित्रांची १० लाख ९१ हजार ९०० रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून याप्रकरणी धुळ्यातील पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. एक संशयित फरार आहे.
सविस्तर वृत्त असे कि, १८ जुलै रोजी एमएच १९ बीई १८०७ क्रमांकाच्या दुचाकीने किशोर पंढरीनाथ पाटील (रा. धरणगाव, जि. जळगाव) हे व्यावसायिक त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा यांच्यासह धरणगावला जात होते. त्यांच्याकडे सोयाबीन विक्रीची १० लाख ९१ हजार ९०० रुपयांची रोकड होती. ते फागणे गावाजवळ पोहोचले असता त्यांना दोन अनोळखी तरुणांनी अडविले आणि खाली पाडले रोकड घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी किशोर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने दोन पथके तयार केली.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता प्रत्येक फुटेजमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर दोन तरुण जाताना दिसून आले. याप्रकरणी धुळ्यातील रत्न ट्रेडिंग येथे काम करणाऱ्या यश विश्वनाथ ब्रहो (वय २२) याला संशयावरून ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याचे साथीदार चंद्रकांत रवींद्र मरसाळे (२१) कल्पेश श्याम वाघ (२६), राहुल श्याम वाघ (३१), सनी संजय वाडेकर (२८) यांनगीर अटक करण्यात आली. दरम्यान, राहुल अनिल नवगिरे (वय २२) हा संशयित फरार आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला बी.एन.एस. ३०९ (६) (३) (५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे