नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथे विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. 9N-AME हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते. काठमांडू पोस्टनुसार, अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली. ते लगेचच विझवण्यात आले. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी काठमांडू पोस्टशी बोलताना सांगितले की, “विमान धावपट्टीच्या दक्षिणेकडून उड्डाण करत होते. अचानक त्याला धक्का बसला आणि आग लागली. यानंतर ते पूर्वेकडील बुद्ध एअर हँगर आणि रडार स्टेशनच्या मध्यभागी असलेल्या एका खड्ड्यात कोसळले.”