मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाचव्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ११ वर्षांपूर्वीच्या एका फसवणूक प्रकरणात पुणे न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे ६ प्रयोग २०१३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते.
प्रत्येक प्रयोगाला ५ लाख याप्रमाणे ३० लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. परंतु, या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड) यांच्याविरोधात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने जरांगे यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र, आंदोलनामुळे ते हजर झाले नव्हते.
यापूर्वीही याच प्रकरणात गैरहजर राहिल्याने न्यायालयाने जरांगे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यामुळे मे अखेरीस जरांगे यांनी हजेरी लावली तेव्हा न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच यापुढे नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर वॉरंट रद्द केले होते. परंतु, यानंतरही जरांगे गैरहजर राहिल्याने पुन्हा वॉरंट काढले.