चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील गजबजलेल्या शास्त्रीनगरातील कुटुंब कुलदेवताला राजस्थानमध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड रक्कम असा ४ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे कि, शुक्रवारी दुपारी २:३० वाजता अनिकेत रमेश भावसार व त्यांचे कुटुंब कुलदैवत आंबाजी माता अबुरोड राजस्थान येथे दर्शनासाठी घराला कुलूप लावून गेले होते. दि. २२ रोजी सकाळी पावणेआठच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटच्या समोर राहणारे सचिन चौधरी यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने फोनवरून सांगितले. व्हिडीओ कॉलवर त्यांना बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडल्याचे दिसून आले. त्यामुळे मंगळवारी सकाळी ते घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला.
घरात प्रवेश करून बेडरूममध्ये तपासणी केली असता लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रुपये, चांदीचे शिक्के, मूर्ती दिसून आली नाही. अनिकेत भावसार यांनी मंगळवारी सायंकाळी शहर पोलिसांत चोरीची फिर्याद दिली. या चोरीत ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चिप, ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट, ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट, ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, १५०० रुपये किमतीचे सोन्याचे पॅन्डल, ४ हजार ५०० रुपये किमतीचे मंगळसूत्र, २ हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट, २६ हजार रुपये रोकड असा एकूण ४ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला पोलिसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे